Friday, October 28, 2011

आत्ये

                  उद्या भाऊबीज, लोकल ट्रेन ला गर्दी असेल म्हणून बाबांनी आजच बहिणीकडे जाऊन यायचं असं ठरवलं. कधी नव्हे ती आई सुद्धा तयार झाली,
मला मात्र औपचारिकता म्हणून विचारलं,"येतो काय रे?? मशीद बंदरच्या आते कडे..."
आणि नेहमीप्रमाणे माझं 'Schedule' तसं tight  होतं,
पण मीही आपसूकच म्हणालो, "हो!!!"
                  लिला आत्ये, मशीद बंदरला राहायला. मी सहावी सातवी ला असताना घरी यायची, आणि ती घरी असली कि घरात काटेकोर शिस्त पाळली जायची. सर्व मित्र मंडळींना घरी येण्यास मज्जाव असायचा आणि निव्वळ या एका कारणास्तव मला लिला आत्येचा फार राग यायचा...
कारण मला वाटतं, जरी प्रेम आंधळं असलं तरी शालेय जीवनात मात्र,
"Friendship  is  Blind...!!!"
पण दम्याच्या त्रासाने हळूहळू आत्येची तब्ब्येत खालावत गेली आणि त्याच बरोबर त्यांचं घरी येणं हि कमी झालं.
                  
                  लहानपणी अगदी नावडती वाटणारी ती आत्ये आता मात्र हवीहवीशी वाटू लागली, रोजच्या धावपळीत हळूच कधीतरी ती आपली गैरहजेरी जाणवून देऊ लागली; कारण काय तर कधी एखाद्या पार्टीला गेलो; तिथे कोणी सूप मागवलं.. कोणी डब्याला सुका खाऊ म्हणून भाकरवडी आणली, किंवा एखाद्या मित्राच्या घरी साधा वरण भात जरी खाल्ला तरी समययात्रा हि व्हायचीच...
                  थोडक्यात काय तर मला आजवर कुणाच्या पाककलेने भुरळ घातली असेल तर ती लिला आत्येने. 'सुगरण म्हणजे काय ??' हे जर चाखून पाहायचं असेल तर आत्येच्या हातचं जेवण जेवावं. आपोआप सगळी उत्तरं सापडतील.
                  माझी आई, जेव्हा नवीनच लग्न करून आली तेव्हा काही वर्ष मशीद बंदरलाच राहायला होती. माझा असा अंदाज आहे कि, आईच्या हातची चव, तिची स्वयंपाकाची ढब पाहता वाटतं हे पाणी याच पाटातून वाहिलं असणार.
                  आज जेव्हा मशीद बंदरच्या मणियार बिल्डींगच्या काम्पौंड मध्ये पाउल टाकलं मन अगदी निवांत होऊन गेलं.. आत्या तर आमची वाटच पहात होती,
                  मला पाहून एक सुखद असा धक्का बसला तिला (माझी उपस्थिती म्हणजे अनपेक्षितच म्हणा).
पण तिचा चेहरा आणखी खुलला जेव्हा "आई"ने उंबरठा ओलांडला. परिवार मंडळींत आईवर जर कुणी हक्क गाजवत असेल, तर ती म्हणजे 'लिला आत्ये'.
                  तिचं ते बोलणं- सरळ-स्पष्ट तरीही मनाला भिडणारं, आणि त्यात भाषेला मालवणी फोडणी.. दुर्मिळ झालंय हे सगळं.
                  दारी सकाळी-सकाळी खटाटोप करून लावलेला इलेक्ट्रिक तोरण अन विविध रंगाचा प्रकाश देणारा बल्ब अशी ती रोषणाई पाहताना तिचा चेहरा असा काही अभिमानाने फुललेला, तिच्या चेहऱ्यावर असं काही तेज उमटलेलं कि उंबरठ्या बाहेरील पणतीला पण असूया वाटेल. . . 
                  अंगाने तशी थोडी खचलीय पण हा दिवस तिचा होता नं. . . तिचे भाऊराय जे आले होते,
                  वेळ कमी होता म्हणून गप्पा जास्त वेळ रंगल्या नाही. . एक धावती फेरी झाली फक्त. हालहवाल विचारपूस झाल्या, भेटी पोचत्या झाल्या.
                  आत्येने ओवाळणीचा ताट आणला. मस्तकी टिक्का लावला, ओवाळलं, आणि जेव्हा मागणं मागायची वेळ आली तेव्हा ती मुग्धपणे उद्गारली,
"असाच दरवर्षी येत जा..!!"
                  माझ्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. तसाही मी हा सोहळा आ वासूनच पहात होतो, ऐकत होतो, जगत होतो. . .

                  जेव्हा निरोप घ्यायची वेळ झाली तेव्हा सगळ्यांना रीतसर नमस्कार केला अन निघताना मी काही बोलणार तितक्यात आत्ये उद्गारली,
"सांभाळून राहा, तब्येत वगैरे सांभाळून कर काय ते..."
                  माझे शब्द माझ्याकडेच राहिले. . . आत्येकडे पाहता, जे मी तिला बोलणार तेच ती मला सांगत होती... अनपेक्षित होतं सारं,
पण असो आता मात्र हाती पेन आहे. . .  म्हणून लिहतोय,

"नंदादीप अशी वसे मनी तुझ्या ज्योत,
करील सर्व तिमिरावर मात"
-वि. वि. तळवणेकर.