Saturday, July 21, 2012

गर्व नाही, माज आहे मला म्हणून सांगतोय !!




       काही वर्षांपूर्वीची गोष्ट हि.
     मी 6वी 7वीत असेन. हम्म! 7वीतच. कॉलनी मध्ये नवीन नवीन फुटबॉल खेळायला सुरवात झालेली, सर्व मोठ्या मुलांनी पैसे गोळा करून बॉल विकत आणला. मग दररोज संध्याकाळी टाकीवर (आमच्यासाठी ते मैदान होतं, चांगली सव्वाशे मीटर लांब सिमेंट ची टाकी) जमायचं. मग एक-एक करून सगळे महत्वाची अशी (वट वाली) पोरं जमली कि त्यातला सर्वात सिनियर संघ निवडायचा.
       खरतर टीम अशी नव्हतीच, ज्याचं ज्याचाशी चांगलं जुळायचं तो एका बाजूला बाकी सर्व लिंबू टिंबू दुसरया साईडला. मी लहान होतो, पण नाक्यावर पोरांत उठणं-बसणं असायचं म्हणून मला नेहमी चांगल्या टीम मध्ये खेळायला मिळायचं. कच्चा लिंबू म्हणून का होईना, पण मी नेहमी त्याच टीम मध्ये खेळायचो.
ते मला 'बॉल आला कि गोलमध्ये ढकल कसातरी, फाउल करू नको फक्त' अशी ताकीद देऊन समोरच्या टीमच्या गोलपोस्ट च्या शेजारी उभे करायचे 'शो-पीस' म्हणून. पण त्यातही मी फार खुशीत होतो (नेहमी जिंकणाऱ्या संघामध्ये उभं राहायला कोणाला नाही आवडत??).
       एकदा मी उशिरा आलेलो, दोन्ही टीम निवडून झालेल्या, समोरच्या टीम मध्ये एक जागा रिकामी होती.
एकजण बोलला, 'ए त्यांचात जा, आमच्यामध्ये जागा नाहीये.'
       मला फार वाईट वाटलं, full रडकुंडीला आलेलो, पण आता आलोयच तर खेळतो म्हणून त्यांच्यात खेळलो. . पण मज्जाच येत नव्हती काही, बॉल आला कि सोडून द्यावासा वाटायचं.
       रात्र झाली, बॉल दिसायचा बंद झाला तसा खेळ पण बंद झाला. मी तसाच रडवेला चेहरा करून बसलेलो, ते पाहून माझा फार चांगला मित्र वयाने मोठा आहे पण आपण त्याच्या खास पंटर पैकी एक; तो जवळ आला आणि म्हणाला,
'बघ, तोंड बारीक करायचं नाही, नेहमी लक्षात ठेव ज्या टीम साठी खेळशील त्या टीम साठी जीव तोडून खेळायचं, असं खेळायचं कि समोरच्याला पूर्ण कावरा-बावरा करून सोडायचं'
       बास्स आणि मी तेच करत आलो. आजवर जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो, ते त्याच भावनेने, त्याच जिद्दीने, त्याच निष्ठेने कि आपले प्रयत्न कुठेही कमी पडत नाही ना याची नेहमी खबरदारी बाळगतो. .

आणि आज या सर्व आठवणींना दुजोरा देण्याचे कारण असे कि,
       सध्या एक वाईट. नाही! वाईट नाही, वाईट म्हणण्यापेक्षा किळसवाणी पद्धत निघालीय, फुटा-फुट करण्याची पद्धत निघालीय. प्रत्येक गल्ली-बोळात एक नवा संघ उभा राहतोय, एक नवीन टोळी चालू पडतेय, एका दिशाहीन ध्येयप्राप्तीपोटी!
       एक परंपरागत चालत आलेला संघ असतो, दिवसागणिक त्या संघाचे पंटर वाढत असतात. मग एक नवा शहाणा येतो. त्याला या संघामुळे चार-चौघात स्थान मिळते. पोरं-टोरं त्याच्याकडे आदराने बघू लागतात. नाक्या-नाक्यावर समोरून हात दाखवला जातो. पण हे सगळं कोणामुळे असतं?? तर संघामुळे!!
       आणि तो शहाणा मग दीड-शहाणा होऊन बसतो. स्वतःला संघाच्या वर समजायला लागतो. आणि मग ती जंगलातली जनावरं कसं आपल्या आवाक्यात असणाऱ्या झाडावर मुतून आपलं वर्चस्व जाहीर करू पाहतात, अगदी तस्सच हे दीड-शहाणे चार नवखी पोरं जवळ करतात आणि एक 'टोळी' उभारतात. पण ते हे विसरतात शेवटी जंगलाचा खरा राजा हा एकच, "THE LION KING" तो एकच.
       त्यांना या गोष्टीचा विसर पडलेला असतो कि त्यांची हि नवी टोळीने कितीही व्यापण्याचा प्रयत्न केला तर शेवटी त्यांच्या कृत्याकडे पाहणारे तिला घाण म्हणूनच पाहणार.
       हो, कदाचित त्यांना ते एकीचं, संघभावनेचं, एकनिष्टतेचं बाळकडू मिळालं नसेल, कदाचित त्यांच्या कानावर हे कोणी घातलं नसेल, कदाचित ते अजूनही त्या अर्भकाप्रमाणे असतील ज्याचे डोळे पूर्णतः उघडले नाहीत अथवा त्यांच्या डोळ्यावर तो मानपमानाचा मुलामा चढवला गेला असेल, आणि तसं असेलच तर आत्ताच सांगतो. . म्हणजे पुन्हा कोणाच्या मनात हा पोरकट आणि विकृतीकडे नेणारा विचार येऊ नये म्हणून: लक्षात ठेवा, पाहिजे तर मनात कोरून ठेवा-
"जे मानचिन्ह, जे नाव, तुम्ही तुमच्या छाताडावर मिरवता, ते तुमच्या स्वतःच्या नावापेक्षा कैकपटीने श्रेष्ट असते."

 -वि . वि . तळवणेकर