Tuesday, January 19, 2016

अडचण



'किती अडचण होत होती ना माझी?' तो नजर रोखून म्हणतो.
'अडचण? कायतरीच काय?' ती हि अजाणतेपणाचा आव आणत उत्तरते.
'हो अडचणच!'
 त्याच्या आवाजात करडेपण कायम होतं, तो तिला अगदी धारेवर धरून उद्देशत होता.
'पसारा तो कोणे एके काळी होता. आता ती अडचणच आहे नाही?'
ती पळवाट शोधत असते, पण त्या अरुंद बाल्कनीतून कुठेच मार्ग सुचत नाही.
'वेड लागलंय तुला.' ती काहीसं दुखऱ्या मनाने म्हणते.
तो हसतो. अगदी प्रायवेटली!
'वेडाचं काय घेऊन बसलीयस.'
तो तिला पाठ करून तिथेच बाल्कनीत उभा राहतो. आणि आकाशातला चंद्र पाहून पुन्हा हसतो.
'हाह! विरोधाभास!' तो मनातल्या मनात म्हणतो.
पण त्याच्या डोळ्यातलं चंद्राचं ते तरल चित्रण ते क्षणिकच.
एकीकडे त्याचा तो कडवा स्वर नि दुसरीकडे तिचं पिळवटलेलं मन. पण आज त्याला कशाचीच तमा नाही.
'तूच बघ ना... पसारा… पसारा हा आवरता येतो..'
'...आणि अडचण?' ती त्याच्या बोलण्याचा वेध घेत त्याला मध्येच तोडून विचारते. 
तो अर्धवट वळतो.
'अडचण? अडचण हि दूरच सारावी लागते!'
खट्ट!!! निरव शांतता.

किती तरी वेळ ते दोघं तसेच पाठमोरे उभे राहतात. आणि सोसवणारा वारा इतकी उंची गाठलेल्या त्या नात्याची ग्वाही देत तिथेच घुटमळत उभा राहतो, एखाद्या उर्मट बघ्या सारखा. त्या उंचीहून किती कैक मैल अंतर गाठायचं होतं त्यांना, किती स्वप्न होती, भटकण्याची, उडण्याची, बागडण्याची.… पण काही नाती कमळासारखी असतात अगदी चिखलातही फुलणारी; तर काहींच्या नशिबी पारिजातकाचं आयुष्य येतं, सुगंधी पण तुटपुंजं. त्यांचंही असंच होतं.
तसा तो वारा एकटाच नव्हता! वाऱ्याबरोबर खिडकीशी लटकवलेलि घंटा उगीच पडदा वर गेल्याचा भेसूर विनोद करत खिदळत होती. एकूणच तिचा सूर पाहता त्यांची जुनी भेट असावी तिच्याजवळ. पण तिच्या नादाने काही हा रंगमंच पुन्हा सजणार नव्हता! मुळात पूर्ण खेळच पडला होता. आता पुढला अंक नाही. आणि या अडचणीचा काही खेद-बीद असला तरी तो काही त्याने तिला दाखवला नाही.

तो तसाच मुठी घट्ट आवळून उभा होता, काहीतरी अदृश्य असं अंगावर झेलत. ती हि तठस्थ उभी होती. वारयाने डोळ्यावर येणाऱ्या केसांची बट मागे सरकवताना, तिने केसात माळलेली लिली त्याच्या पायाशी पडली होती. तो पाहतो पण त्या ओसरत्या गंधाचा मोह आवरतो. तो गर्रकन मागे फिरतो अन बाल्कनीच्या अरुंद दारातून बाहेर जायला निघतो. ती दचकते. पण त्याला वात करून देते.

तो आपली बॅग आवरतो तोवर ती बाल्कनीच्या दाराशीच खिळून राहते. आणि तो निघणार तशी ती लगबगीने दाराशी येते.  दोघंही एका अर्धवट उघड्या दाराशी उभे असतात. तो त्या अर्धवट उघड्या दारातून तिच्याशी नजरभेट करतो. आणि तिच्या मागे त्या रिकाम्या बाल्कनीकडे एक नजर फिरवतो. त्याला वाटलं किमान तिची तरी अडचण दूर झाली!

ती मात्र पाहतच राहते. ना खंत, ना निषेध!

तो परततो, काळोख्या चंद्रप्रकाशात. आपला पसारा आपल्या छातीशी धरून. तिची आणखी एक अडचण दूर करत!

-वि. वि. तळवणेकर