Tuesday, December 17, 2013

सुखाचं चिटोरं


                  दर दुसर्या व चौथ्या शनिवारी कॉलनीच्या थेटरात (पत्र्याच्या शेडमध्ये) कॉलनीचा हास्य कट्टा भरतो. सोसायटीच्या अनेक उपक्रमातील एक. मी सहसा असल्या कार्यक्रमांना भिक घालत नाही पण आजकाल सगळेच एकदम बिझी मोड वर चालतात, तर अधून मधून जाउन बसतो शेवटच्या बाकावर. साठे साहेब या कट्ट्याचे जनक. ते आपल्या हलक्या-फुलक्या चुटकुल्यांची सांगड घालत मंच सांभाळतात. चांगली २०-२५ हौशी मंडळी जातीने जमतात व सोबतच काही बुजुर्ग मंडळी कॉलनीत आडोश्याला झाड नाही म्हणून या शेड मध्ये येउन बसतात. लहान्यांची ये-जा, पकड-पकडी चालूच असते.  घड्याळाने ६ चा टोला दिला कि साठे साहेब कट्ट्याला सुरवात करतात. दाराकडे मीच बसलेलो म्हणून मला खुणेनेच सांगितला दार बंद करा म्हणून. मी आपलं पायानेच पुढे सारलं आणि टेकून बसलो बाकावर.
                  कट्ट्यावर खूप नमुने मंडळी जमतात आपापले किस्से सांगायला. प्रत्येकाने आपला किस्सा कागदावर लिहून साठ्यांकडे द्यायचा ते त्यातला सर्वात हास्यास्पद किस्सा निवडणार, व त्या व्यक्तीने तो २ मिनिटात सादर करायचा. म्हणजे अर्ध्या तासात कट्टा बरखास्त केला जातो. तर. ६ वाजलेत आता कट्टा खुला.
                  साठे प्रस्तावना म्हणून आपलाच एक कोणता तरी किस्सा सांगतात, कधीतरी ते आपल्या बायकोवर पुरते बरसलेले. त्यांचा कोणता आवडीचा शर्ट सापडत नव्हता म्हणे, आणि बायकोने निवांतपणे त्यांना आरशासमोर नेउन उभं करते. आणि ते प्रकरण शर्टाचा खिसा हलका करून कसं निस्तरलं असं काहीतरी . . सांगून मग स्वतःच थोडे हसले मग सामंत आणि पोष्टेसाहेब टाळ्या देत देत हसले (त्यांना आपलंच काहीतरी आठवून गुदगुल्या झाल्या असणार कारण इतर सर्व फारतर ओठ किंचित हस्ल्यागत करून शांत राहिले). त्या पाठोपाठ ४-५ जण आणखी येउन गेले. त्यातल्या त्यात रानडे काका बाजी मारून गेले. कारण त्यांच्या रिक्षावाल्या भय्याच्या फसगतीवर सगळे बेंबीच्या देठापासून अगदी खो-खो करत हसले.
                  मग साठ्यांनी पवार म्हणून कोणतरी मधल्या बाकावर बसलेल्या माणसाला मंचावर बोलावलं. ते एकदम ताडकन उठून उभे राहिले. क्रीम कलरचा शर्ट, खाली पायजमा. हे कट्ट्यावर नेहमी येतात एवढीच यांची आणि माझी ओळख पण आज वाटतं प्रथमच समोर जाणार होते असा एकंदरीत त्यांच्या वागण्यातून दिसत होतं.
                  स्प्रिंगचा बाहुला टुन-टुन करत जावा तसे ते समोर जाउन उभे राहिले. डोळे मिचकावत सगळ्यांना एकदा पाहिलं आणि मग हातातल्या काहीशा घडी पडलेल्या चिठ्ठीत डोकं खुपसून ढसा-ढसा रडायला लागले.
१५-२० सेकंद ते तसेच रडत होते, सगळ्यांना यात काहीतरी मिश्किल असावं म्हणून मजा येत होती. लोक त्यावर फिदी-फिदी हसत होते. पण पवारकाका अगदी ओक्साबोक्शी होऊन रडत होते. वातावरण एकदम गंभीर झाला. साठ्यांना काय करू उमजेना. लहानगी मंडळी डोळे मोठे मोठे करून पहात होते. साठे धीर द्यायला म्हणून जवळ गेले. तर साठ्यांना झिडकारून पवार मागच्या दरवाज्याने बाहेर निघून गेले. कट्टा सुन्न.
                  दरवाजा वीतभर उघडा होता, त्या फटीतून मी पवारांना मैदानाकड्ल्या बाकावर जाउन बसताना पाहिलं. मी हळूच दार सारून बाहेर पडलो. मैदानात जाउन पाहिलं मुलं एकीकडे खेळत होती. पवार अजूनही तिथेच होते व काहीतरी पुटपुटत होते. मघाशी शेड मध्ये थोडा अंधार होता म्हणून काही कळायला मार्ग नव्हता, पण संध्याकाळच्या तिरप्या किरणात त्यांचे पाणी तरारलेले डोळे स्पष्ट दिसत होते. मी समोर गेलो तर त्यांनी घट्ट मिठी मारली, त्यात ती चिठ्ठी खाली पडली. मी शांतपणे उभा होतो. जेव्हा त्यांनी परत माझ्याकडे पाहिलं तर ते हसत होते. मला थोडं बरं वाटलं. आनंदाश्रू. पण लगेच नजर खाली केली.
                  मी खाली वाकून ते चिटोरं उचललं. त्यावर तुटक अक्षरात गिरबटून ठेवतात तसं काहीतरी लिहलं होतं. मी पूर्ण वाचलं तर चेहऱ्यावर एकच ओभड-धोबड हास्य उमललं. तारीख हि होती पण ती फार जुनी होती. माझ्या लक्षात आलं पवारांचं बछडं असणार हे पण यापूर्वी त्यांना कोणासोबत येताना पाहिलं नव्हतं. मी त्यांना प्रश्न नाही केले. तो कागद त्यांच्या अर्धबंद मुठीत देत मी त्यांच्या सोबत बाकावर बसून राहिलो. समोर पोरांचा खेळ पाहत राहिलो. एकदा वळून पाहिलं काका तसेच हसत होते. मी शंका मांडली नाही, ते कोणाचं अक्षर आहे, आता कुठे असतात राहायला? वगैरे वगैरे असा काही नाहि.
                  त्यांच्या चेहऱ्यावर हर्ष होता, आणि त्यापलीकडे माणसाने जाउच नये. मी तिथेच निवांत बसलो. या विचाराने कि, ' काय कमाल आहे ना? खिशात कितीतरी चिटोरी असतात, रंगवलेली, नक्षीकाम केलेली, पिंपळपानाप्रमाणे जपलेली, पण सुख कोणत्या चीटोऱ्यातून उलगडून बाहेर येईल सांगता येत नाही.'

-वि. वि. तळवणेकर

Tuesday, December 10, 2013

ज्याला जे पटेल ते, म्हणजेच. . दहीहंडीसाठी वाट्टेल ते

हा ब्लॉग लिहिण्यामागे समीक्षण वगैरे असला, किंवा उगीचच सिद्धेश आपला मित्र म्हणून उसनी तारीफ करा यातला कोणताही हेतू नव्हता पण ते असतं ना… थरात कोणीतरी बेंबीच्या देठापासून आवाज देतो, "अरे. .  बोल बजरंग…" आणि आपल्या तोंडून आपसूकच निघतं ". . . . बली कि जय!!!" असंच काहीसं हे, म्हणजे मला जे पटलं ते.  
                 अनुबंध २०१३ या कार्यक्रमात साद एन्टरटेनमेंट प्रस्तुत सिद्धेश सावंत दिग्दर्शित "दहीहंडीसाठी वाट्टेल ते" हा स्मिता पाटील लघुपट स्पर्धेत घवघवीत यश (सर्वोत्कृष्ट लघुपट आणि एडिटिंग - प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - द्वितीय क्रमांक) संपादन केलेला माहितीपट प्रसारित करण्यात येणार होता, साडेसात वाजता रवींद्र नाटयमंदिरला. साडेपाच पर्यंत घरीच होतो. आलं मनात, सरळ प्रभादेवी गाठलं, रवींद्र नात्य मंदिर. डोक्युमेंट्री सुरु झाली, आणि त्यात दर्शवलेला विरोधाभास, याबरोबर प्रेक्षकांचा हशा, आणि थराराबरोबर हायसे होणारे कित्येक श्वास इथेच हंडी हाताला लागल्यागत होत असेल निर्मात्यांना. डोक्युमेंट्री संपल्यावर रंगमंचावर प्रकाश पडला, सोबतच प्रेक्षकांच्या विचारशक्तीला उजाळा मिळाला असेल यात शंकाच नाहि. कारण डोक्युमेंट्री संपल्यावर एक मान्यवर व्यक्ती मंचावर येउन बोलून गेली, आणि त्यांना जे भावलं ते मी जे टिपलं त्याहून पुरतं निराळं होतं. मनातच हसलो स्वतःशीच.

                 महाराष्ट्रात आणि मुख्यतः ठाणे-मुंबई परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा दहीहंडी उत्सव विविध माध्यमांद्वारे जगभर प्रसारित केला जातो. तसं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या अंगाने हि दृश्य टिपली जातात, हंडी वरून, खालच्या थरातून, दूर अंतरावर राहून, धावत्या वाहनावरून, बाल्कनी-गच्ची मधून, आयोजकांच्या मंचावरून! जशी सोय होईल तशी.
                 पण "दहीहंडीसाठी वाट्टेल ते" पाहिल्यावर टी व्ही वरून आपल्या पर्यंत जे पोहोचतं ते एकंदरीतच फार एकांगी असं चित्रण आहे असं वाटतं. सह्याद्रीवर, बातम्यांमध्ये व इतर वाहिन्यांवर जी काही दृश्य आणि "शोर मच गया शोर" "गोविंदा आला रे…" अशी सिनेगीतं या मागे, या उत्सवाच्या गाभ्यात, त्याच्या अंतरंगात व बाह्यांगात जो भाव आहे (आणि हो भाव म्हणजे ती पाच आकडी, सहा आकडी संख्या नव्हे बरं का? ) जी कळवळ आहे ती सर्व थरांमध्ये पोहोचली जात नाही, मधेच कुठेतरी कोलमडून पडते.
                 सिद्धेश आणि त्याच्या टीमने मिळून या उत्सवाचा सर्वागीण अभ्यास करून एक आर्थिक, मार्मिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, बेसुमार, भेसूर व वलयांकित अशा सर्व भूमिकेतून उत्तम रित्या मांडलंय.
                 मला विचाराल 'हा माहितीपट कोणासाठी??' तर दहीहंडीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा संबंध असणाऱ्या प्रत्येकासाठी, मराठी संस्कृती, राजकारण, व्यावसायिकीकरण हे एका रिंगणात घेऊन बोलणाऱ्या प्रत्येकासाठी, आणि हो खांद्याला खांदा भिडवून उत्तुंग पराक्रम गाजवणाऱ्या त्या गट्सी गोविंदासाठी!!
                 गोविंदाबद्दल याहून बोलकं आणखी काही असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे यात प्रत्येकासाठी काही ना काही आहे हेच याचं यश आहे, सगळंच कसं माथ्यात शिरणार? मडकं उतू जाइल अशाने. पण थोडं-थोडकं का होईना पण ज्याला जे पटेल ते म्हणजेच . . दहीहंडीसाठी वाट्टेल ते!

-वि. वि. तळवणेकर