हा ब्लॉग लिहिण्यामागे समीक्षण वगैरे असला, किंवा उगीचच सिद्धेश आपला मित्र म्हणून उसनी तारीफ करा यातला कोणताही हेतू नव्हता पण ते असतं ना… थरात कोणीतरी बेंबीच्या देठापासून आवाज देतो, "अरे. . बोल बजरंग…" आणि आपल्या तोंडून आपसूकच निघतं ". . . . बली कि जय!!!" असंच काहीसं हे, म्हणजे मला जे पटलं ते.
अनुबंध २०१३ या कार्यक्रमात साद एन्टरटेनमेंट प्रस्तुत सिद्धेश सावंत दिग्दर्शित "दहीहंडीसाठी वाट्टेल ते" हा स्मिता पाटील लघुपट स्पर्धेत घवघवीत यश (सर्वोत्कृष्ट लघुपट आणि एडिटिंग - प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - द्वितीय क्रमांक) संपादन केलेला माहितीपट प्रसारित करण्यात येणार होता, साडेसात वाजता रवींद्र नाटयमंदिरला. साडेपाच पर्यंत घरीच होतो. आलं मनात, सरळ प्रभादेवी गाठलं, रवींद्र नात्य मंदिर. डोक्युमेंट्री सुरु झाली, आणि त्यात दर्शवलेला विरोधाभास, याबरोबर प्रेक्षकांचा हशा, आणि थराराबरोबर हायसे होणारे कित्येक श्वास इथेच हंडी हाताला लागल्यागत होत असेल निर्मात्यांना. डोक्युमेंट्री संपल्यावर रंगमंचावर प्रकाश पडला, सोबतच प्रेक्षकांच्या विचारशक्तीला उजाळा मिळाला असेल यात शंकाच नाहि. कारण डोक्युमेंट्री संपल्यावर एक मान्यवर व्यक्ती मंचावर येउन बोलून गेली, आणि त्यांना जे भावलं ते मी जे टिपलं त्याहून पुरतं निराळं होतं. मनातच हसलो स्वतःशीच.
महाराष्ट्रात आणि मुख्यतः ठाणे-मुंबई परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा दहीहंडी उत्सव विविध माध्यमांद्वारे जगभर प्रसारित केला जातो. तसं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या अंगाने हि दृश्य टिपली जातात, हंडी वरून, खालच्या थरातून, दूर अंतरावर राहून, धावत्या वाहनावरून, बाल्कनी-गच्ची मधून, आयोजकांच्या मंचावरून! जशी सोय होईल तशी.
पण "दहीहंडीसाठी वाट्टेल ते" पाहिल्यावर टी व्ही वरून आपल्या पर्यंत जे पोहोचतं ते एकंदरीतच फार एकांगी असं चित्रण आहे असं वाटतं. सह्याद्रीवर, बातम्यांमध्ये व इतर वाहिन्यांवर जी काही दृश्य आणि "शोर मच गया शोर" "गोविंदा आला रे…" अशी सिनेगीतं या मागे, या उत्सवाच्या गाभ्यात, त्याच्या अंतरंगात व बाह्यांगात जो भाव आहे (आणि हो भाव म्हणजे ती पाच आकडी, सहा आकडी संख्या नव्हे बरं का? ) जी कळवळ आहे ती सर्व थरांमध्ये पोहोचली जात नाही, मधेच कुठेतरी कोलमडून पडते.
सिद्धेश आणि त्याच्या टीमने मिळून या उत्सवाचा सर्वागीण अभ्यास करून एक आर्थिक, मार्मिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, बेसुमार, भेसूर व वलयांकित अशा सर्व भूमिकेतून उत्तम रित्या मांडलंय.
मला विचाराल 'हा माहितीपट कोणासाठी??' तर दहीहंडीशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा संबंध असणाऱ्या प्रत्येकासाठी, मराठी संस्कृती, राजकारण, व्यावसायिकीकरण हे एका रिंगणात घेऊन बोलणाऱ्या प्रत्येकासाठी, आणि हो खांद्याला खांदा भिडवून उत्तुंग पराक्रम गाजवणाऱ्या त्या गट्सी गोविंदासाठी!!
गोविंदाबद्दल याहून बोलकं आणखी काही असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे यात प्रत्येकासाठी काही ना काही आहे हेच याचं यश आहे, सगळंच कसं माथ्यात शिरणार? मडकं उतू जाइल अशाने. पण थोडं-थोडकं का होईना पण ज्याला जे पटेल ते म्हणजेच . . दहीहंडीसाठी वाट्टेल ते!
-वि. वि. तळवणेकर
No comments:
Post a Comment