Wednesday, April 9, 2014

नुसती कागदावर उतरवली म्हणून. .




कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची?

एका मागून एक गिरबटलेलं कडवं,
कडव्याच्या शेवटी पुन्हा तेच धृवपद येतं आडवं,
अस्सल कविता तर आमची आजी विणायची,
मंद ताल देणारं तिचं खुटयावरचं बोट,
अन जात्याबरोबरच भरडणारे तिचे आडवळणी  ओठ,
झाकल्या मुठीने किती छान गुणगुणायचे. .

कुणीतरी कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची?

'चिऊ' ला यमक 'काऊ' अन 'राम' ला यमक 'श्याम',
कविता म्हटलं कि असलंच नुसतं जुळवाजुळविचं काम,
काव्य शोधायचं असेल तर त्या कवायतीच्या पटांगणात थांब,
चपळ सर्पा प्रमाणे लांब लचक रांग,
एका ठेक्यात सावधान दुसरया ठेक्यात विश्राम,
कदम ताल करता करता दहिने मूड कर तडख सलाम.

बसल्या बैठकीत कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची?

समोर कागद, पेन आणि मनात घुसमट उरायची,
साद ऐकायला कोणी नाही म्हणून भावनांना हि पळवाट करायची,
अरे थोडा मॅड होऊन घराच्या भिंतींबाहेर ये,
झरयापाशी बसून निसर्गाचं पद्य खोलवर घोटून घे,
पाहून ये त्या स्वैर बागडणाऱ्या फुलपाखरांचं हेवन,
आणि प्रवाह विरोधी पोहणाऱ्या माश्या भोवतालचं 'जीवन'

आता तुम्हीच सांगा ना . . नुसती कागदावर उतरवली म्हणून काय तिला कविता म्हणायची?

- वि. वि. तळवणेकर

No comments:

Post a Comment