Saturday, May 10, 2014

ठराव

पक्ष्यांचा किलबिलाट केव्हाचाच क्षीण होऊन गेला होता. ती केव्हाची येउन पारापाशी गिरक्या घेत उभी होती. सारखी सारखी मान उंचावून पाहतेय, दूर वर कोणाची चाहूल लागतेय का ते. पण कोणी नाही.
'आपलं ठरलं होतं, सकाळच्या प्रहराला भेटायचं. . . हुह्ह !' ती स्वतःशीच पुटपुटत झाडाची पानं कुस्करून जमिनीवर भिरकावते, व पुन्हा गावाकडे पाहते.
शेवटी घिरट्या घालून घालून दमून खिन्न मनाने पारावर जाउन बसते. आता फक्त रडू फुटायचं राहिलं होतं तेवढंच. तोच कोणीतरी धापा टाकत येत असल्याचा आवाज येतो.
ती आयुष्यभराच्या अपेक्षांचं ओझं घेऊन वळते. पण त्याला रिकामी हाती येताना पाहून अधिकच खिन्न होते.
तो तिच्या समोर येउन उभा राहतो. तिची संपूर्ण काया नजर भरून पाहत राहतो, मग क्षणभर तिचा चेहरा न्याहाळतो. आणि माहित असूनही उगाचच विचारतो,
'काय झालं?'
ती हिरमुसून म्हणते, 'काही नाही.'
तो चटकन परत प्रश्न करतो, 'काही उत्तर नाही मिळालं ना?'
ती हलकंसं वर पाहते पण काही बोलत नाही.
तो तिला खांद्याला धरून खाली बसवत म्हणतो, 'अगं प्रियकर गं मी, मी तेच बोलणार जे तुझ्या काळजात भिनणार'
ती नेहमीसारखा त्याचा बचाव करत तुटक स्वरात म्हणते, 'तसं काही नाहीये.'
तो आपले पाणावलेले डोळे दूर करत म्हणतो, 'तसंच आहे. अगं वेडाबाई जग म्हणजे प्रियकर नव्हे गं. या जगाशी तुझं काही नातं नाहि. त्यांनी कितीही,  कितीही आत्मियतेने आरसा दाखवला तरी तुला माझीच छाया लागणार. का सांगू?'
ती भाबडेपणाने विचारते, 'का ते?'
तो थोडं पोकळ हसतो. तिचा तो मेहंदी न उजळलेला हात अलगद हातात आपल्या घेतो. आणि अलवारपणे गोंजारत म्हणतो,
'कारण इथे निरसन नाही झालं तरी समाधान आहे. . '
ती हसते. पटलं हे. ती पण हळूवार पणे आपली बोटं त्याच्या हातात खिळवत त्याच्या छातीवर डोकं टेकवून त्याला बिलगून बसते. ती त्याच्या छातीचे ठोके ऐकत राहते. तो बोलत राहतो.
". . पण हा गारवा क्षणिक. कालांतराने ऋतूपालट होणार, पानझडी होणार. मग एक बोडकी, रुक्ष सोबत उरणार जिच्या सहवासाने तुझी उन्हाची झळ परतून लावायची क्षमता क्षीण केली असणार. मग हे झाड हि नको व ती झळ हि नको."
ती चिडून पायातली चप्पल पायानेच झटकते. त्याच्या छातीशी बिलगलेली ती, त्वेषाने हातानेच त्याला दूर करू पाहते.
तो हात फ़ैलाउन चकित होऊन तिच्याकडे पाहत राहतो.
दोघांची नजरानजर होते. तिचे डोळे लालेलाल झालेले असतात.
ती लगोलग त्याच्या मिठीत जाते. .
'उह्हू. . . गप्प बस. आपलं ठरलं होतं ना . . '
तो तिचे केस कुरवाळतो, तो परत काहीतरी बोलणार तितक्यात त्याला आधीच तोडत कडाडते, 'काही नको बोलूस तू!'
काही काळ ती तशीच बसून राहते, पूर्णतः त्याच्यात विलीन होत. आणि मग एका झटक्यात त्याला दूर सारत तो अर्धवट लोम्बणारा गजरा, ती भरजरी शालू नेसलेली, हिरवा चुडा घातलेली प्रतिमा एकदाही मागे वळून न पाहता पाठमोरीच निघून जाते. आणि तो मर्त्य अवस्थेत पाहत राहतो. व प्रहर बदलतो.

-वि. वि. तळवणेकर

No comments:

Post a Comment