Saturday, December 20, 2014

स्तब्ध

               अंधुक गर्दी होती. दुपारची वेळ. रविवार. म्हणजे रस्त्यावर एक गोजिरी वर्दळ. पिवळं उन अंगावर घेत शुभ्र कपड्यात  घराबाहेर पडलेली माणसं, काही मागील आठवड्याची दुरुस्त करायची म्हणून तर काही येणाऱ्या आठवड्याची आखणी करायची म्हणून.
               त्यात कुठेतरी रित्विक पण होता. आठवड्या भराचं सामान घ्यायला म्हणून. त्या प्रसन्न खेळीमेळीच्या वातावरणात आपलं असं वेगळेपण जपणारा. गालावर हलकीशी दाढी. आयुष्याची राख रांगोळी तो अंगावर एखाद्या दैवी भस्मासारखं परिधान करून वावरत होता. आणि त्या सन्दुक रुपी देहाला टाळं म्हणून डोळ्याला काळा चष्मा.
               म्हणजे असा कधी बाजारहाटाला तो निघत नाही म्हणा. पण गेल्या बारा वर्षाचं तप त्याचं, जेव्हा केव्हा जगण्यात "रुटीन" येउन बसेल तेव्हा काहीतरी वेगळं असं करावं म्हणून तो आलेला. तो त्या बाजारातून झपाटल्यागत सपसप पुढे जात होता. एखाद्या भाजीवाल्यासमोर थांबून भाजी एकटक न्याहाळत होता. काहीच न बोलता, काहीच न ऐकता. नाही पटलं कि ओठावर एक सूक्ष्म उसासा दिल्यागत भाव एकवटून सरळ दुसरीकडे. "स्पीड डेटिंग" म्हणजे काय हे जरी ठाऊक नसलं तरी "स्पीड शॉपिंग" मध्ये रित्विकचा हातखंडा होता.
               भाजीपाला, मसाला, आणि काही-माही घेत रित्विक थोड्याश्या मोकळ्या भागात आला. तहान लागलीय. त्याचे ज्यूस पार्लर शोधणारे डोळे सांगत होते.
               आणि डावीकडून उजवीकडे वळणारी रित्विकची  नजर जेव्हा थेट समोर येउन स्थिरावली, तेव्हा तो पुरता पांढरा झाला. चटकन एक मोती पापण्यात येउन अवतरला. त्याच्याने तो पुसायला हात हि वर होत नव्हता. हातातल्या पिशव्या टन भर वजनी सिलिंडर सारख्या भासू लागल्या. त्याने हात सैल सोडले. पिशव्या जमिनीवर पडल्या. कांदे-बटाटे फुटपाथ वरून रस्त्यावर घरंगळत गेले.
               समोर… समोर. . . . शीना होती. तशीच, अगदी तशीच जशी ती रोज त्याच्या स्वप्नात यायची. तसेच हवेवर उडणारे केस, डोळ्यात एक मंद चमक, तीच कांती, फक्त थोडी अधिक चमकदार आणि तेच तठस्थ ओठ.
तिची नजरानजर झाली. ती थंड! रित्विक मुग्ध होऊन पाहतच होता.
               एरवी कधीही बोलताना न कचरणारा रित्विक अचानक झालेल्या त्या भेटीने भयंकर कचरला होता. घुसमट होत होती. त्याने शर्टाच वरचं बटन उघडलं.
"हाय" तो कचरत कचरत म्हणाला.
ती पाहत होती, रित्विक ची चलबिचल, "हाय", शीना हसत म्हणाली.
"क. . . कशी आहेस. . कशी . . कशी आहेस?" रित्विक शीनाच्या गळ्यातल्या मंगल सूत्राकडे एक चोरटी नजर टाकत म्हणाला.
रित्विकची नजर चुकवत ती खाली वाकली, त्याची पिशवी उचलत म्हणाली, "ठिक. तू?"
तो तिच्या त्या तुटक शब्दांवर हसला. काहीच बदललं नाही. मनात घुटमळला.
"Better than ever!" खोटा आव आणत तो उत्तरला. आता जमतं हो त्याला खोटं बोलायला.
"हम्म" शीना शांत राहिली.
"इथेच आहे मी सध्या." रित्विक म्हणाला. त्याला काहीच सुचत नव्हतं.
असंच होतं त्याचं, त्याला तो प्रपोजल चा दिवस आठवला, काहीही बरळत होता तो, कशाचाच कशाशी मेल नाहि. फक्त तिच्यासाठी अतोनात प्रेम. आणि तेव्हाही ती त्याच नजरेने पाहत होती ज्या नजरेने ती आज पाहत होती. काही न बोलता.
"चल इथेच जवळच आहे flat माझा." त्याच्या छातीत एकाच गोळा आला होता. impatience! weakness! त्याने आतल्या आत जीभ चावली.
"चल" ती सहजच म्हणाली. जणू काही झालंच नाही.
रित्विक काहीश्या कापरया हाताने पुढे आला, तिच्या हातातली पिशवी उचलली. तिने हात अलगद झटकला. म्हटलं, "राहू दे."
               थोडी गर्दी होती म्हणून तो एक पाउल पुढे चालत होता, आणि ती मागे. अधून मधून तो वळून पाहत होता. ती सहज हसली आणि रित्विक अवघडल्यागत होऊन हलकं हसला. जशी वाट मोकळी झाली तसे ते दोघं सोबत चालत होते. किती काय काय चाललेलं त्या भांडावलेल्या डोक्यात. भ्रम तर नव्हता ना? तसही उभं दशक गेलं स्वप्न रंगवत, आता काय खरं, काय खोटं याचा थांगच लागत नाही. कित्येकदा तो सकाळी सकाळी तिच्या नावाने आकांत करत उठला होता. घामट्लेल्या कपड्यांनी. आणि तासंतास समोरच्या भिंतीवरील तिच्या फोटोकडे पाहत एकटाच ढसाढसा रडला होता. आज हि तसच होतंय का? हा हि मनाचाच खेळ आहे का? नाही! उनाचे चटके खरे आहेत से दिसतायत. खरंय हे. हा!
               बिल्डींग च्या लिफ्ट समोर उभे राहून दोघे वाट पाहत होते,
६. . ५. . . ४. . .
               लिफ्टच्या दरवाज्यामध्ये दोघांचं प्रतिबिंब पाहून रित्विक परत हरवला. शीना हि एकदा समोर पाहून चटकन मान खाली घालून उभी राहिली. रित्विक ने एकदा शेजारी पाहिलं . तिला uncomfortable वाटत होतं. त्या दिवशी हि ती तसंच feel करत होती.
               रित्विक ला त्याची दाढी उगाच टोचत होती. तिला कधीच आवडायचं नाही दाढी वाढवलेलं. क्लीन शेव करावं. जेन्टलमन सारखं राहावं असा सारखा तिचा हट्ट. आज सकाळी शेव न केल्याचा त्याला राग आला. पण असाही वाटलं कि तिने ते नोटीस करावं. रित्विक दाढी कुरवाळत होता. शीना हसली.
"करायची होतीस, आता खंत करून काय होणार?" ती सहज म्हणाली. पण रित्विक ला जिव्हारी लागलं.
तो आयुष्यभर खंतच तर करत आला होता, आपल्या मूर्खपणावर, वेंधळेपणावर आणि न जाणो कश्या कश्यावर.
३ . . २ . . १ . . ० .
लिफ्ट आली, दोघंही आत गेले. लिफ्ट मध्ये थोडा उकाडा जाणवत होता. त्याने घाम टिपला. शेवटचा मजला आला. त्याने घराचं दार उघडलं. आत सोफ्यावर तिला बसायला सांगितलं
"कॉफी घेऊन आलो." असं म्हणत तो किचन मध्ये गेला.
               त्याला मनात खूप इच्छा होती तिला कसं वाटेल घर? तिचा तो फोटो पाहून? आवडलं असेल का?
आणि जसा तो किचनच्या दारात तो घुसला, त्याला घेरी आली. आणि मग अंधार. लख्ख. हो लख्ख, रित्विक साठी अंधार म्हणजे लख्ख, सवय जी झालेली त्याची.
               पण जेव्हा तो शुद्धीवर आला, तेव्हा लिविंग रूम रिकामी होतं, शिवाय त्याने सोबत आणलेली पिशवी. तिथे ना शीना होती. ना तिचं अस्तित्व, ना तिचा गंध होता, फक्त होता तो तिथे भिंतीवर त्या चौकटीमध्ये तिचा चेहरा, रित्विककडे रोखून पाहणारा!
               रित्विक चीत्कारून उठला. चिडला. सरळ धावत सुटला. खाली उतरला. रस्त्यावर कोणी नव्हता. वॉचमनला विचारलं, तो हि नकारार्थी उत्तरला. उन डोक्यावर होतं आणि हा वेडावून सैरवैर पाहत होता. छाती धडधडत होती.
               शेवटी तो बाजारात येउन थबकला. तिथे त्याची पिशवी तशीच पडून होती. आणि सामान विखुरलं होतं. ते खुलं पोतेरं पाहत तो वेडावून तिथेच स्तब्ध उभा राहिला. तप चालूच होतं. आणि तो तिथेच होता. स्तब्ध.
-वि. वि. तळवणेकर

No comments:

Post a Comment