Sunday, July 31, 2016

येतोय मी

फोटो - आशिष तावडे 
अरे मी काय  म्हणतो,
मित्रा ... ए ... शुक शुक . . ए दादा..
मी काय म्हणतोय,
हा बोल ना भावा.
हा . .
तर मी म्हणतोय . .
बाप्पा ला बाप्पाच राहू द्या कि,
अरे काय म्हणतो तू ?
राजा आहे हा आपला राजा!!!
यंदा हि स्पर्धेचा जॅक लावलाय,
आपणच जिंकणार!!!
गॅरंटी देतो मी!

हा...
हाच मुद्दा आहे माझा बघ
ते बघ ना ते कधीचे ताटकळत राहिलेत,
त्यांना एकदा बाप्पाला मनोभावे पाहू द्यात. .. .
भावा उद्या विसर्जनाचा दिवस आहे लायनीला गर्दी तर असणारच.
तरी पण बघ ना रे.
अच्छा तुझे खास आहेत का ??
थांब. . बघतो मी,
ए परश्या!!! त्या उंदराच्या टोपीवाल्याला काकांना सोड रे आत!
हा!!!! तर सांगतो काय तुला,
आपल्या शब्दावर सगळं होतं इथे,
गॅरंटी देतो मी!

अरे म्हणजे तसं नाही रे
म्हणजे हे कसले काय गेट
नि हा कसला काय पास?
कसली हि श्रद्धेपोटी तारण ठेवलेली भेटींची आरास?
अरे तसं नसतं रे. .
तू ना फक्त अंगाने सुटलायस पण अकलेने लहान आहेस तू . .
मघाशी आत गेलेलास ना तू?
पाया पडलास ना? दानपेटीत पैसे टाकलेस ना?
आता परत एकदा जा आत
जा आणि आता आपल्या राजाकडे थोडी अक्कल माग.
म्हणजे तसा  नवस वगैरे म्हटला तर चेष्टेचा भाग. .
अख्ख्या शहरात त्या तिकडच्या गल्लीतल्या महाराजा नंतर फक्त आपल्याच मंडळाचा नाद!
जा तू जा.. बिंधास माग! मागशील ते मिळेल. .
गॅरंटी देतो आम्ही!

अरे अरे . . पण तिकडे कुठे चालला तू ?
अरे आता ते चलचित्र सुरु होतंय.
सकाळ पासून तो हॅलोजन डाउन होता,
आणि नेमका तेव्हा डेकोरेटर्स वाला पण 'लावून' होता. .
आता जाऊन बघ छान प्रकाश पडेल..
गॅरंटी देतो मी. .
अरे नको नको रे मित्रा, परतायला हवं,
पण बरं का मित्रा. .  सगळ्यांना सांग हा पण,
पुढच्या वर्षीही. . . . . . .
. . . . . . . . . . येतोय मी.
. . .
ऑं ???
. .
आणि हो . . तुमच्या शब्दाने होत असेल तर . .
ते राजाचा बाप्पा होत असेल तर बघा ना जरा. .
चला . . .
येऊ मग???


-वि. वि. तळवणेकर 

No comments:

Post a Comment